मल्लिकार्जुन हे दुसरे ज्योतिर्लिंग.आंध्र प्रदेशातील कुर्नुल जिल्हयात श्रीशैल्य पर्वतावर हे लिंग आहे.शंकराचा पुत्र कार्तिकेय रुसुन श्रीशैल्य पर्वतावर गेला म्हणून शंकर पार्वतीसह श्रीशैल्यावर आले व लिंगरुपाने तेथे कायमचे राहीले. हे एक प्राचीन पवित्र तीर्थस्थळ आहे.
फ़ार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. चंद्रगुप्त नावाचा एक राजा होता. त्या राजाला देवीच्या आशिर्वादाने एक मुलगी झाली. तिचे नाव चंद्रावती. चंद्रावती जन्मास आली त्याच वेळेस चंद्रगुप्त स्वारीवर गेला.परंतु त्याच्या शत्रुंनी त्याला पकडले व चौदा वर्षे तुरुंगात ठेवले.चौदा वर्षानंतर राजा घरी परत आला तो त्याला चौदा वर्षांची रुपवती चंद्रावती दिसली. ही आपली मुलगी आहे हे तो विसरला होता. चंद्रावती आपली बायको झाली पाहीजे असे त्याला वाटू लागले." ही तुमची मुलगी आहे.ती तुमची बायको कशी होईल?" असे राणीने वारंवार सांगितले. पण राजाला ते पटेना. तो चंद्रावतीला पकडू लागला.चंद्रावती घाबरली आणि एक दिवस रात्री एक गाय बरोबर घेऊन घराबाहेर पळाली. राजाला हे समजताच तो तिचा पाठलाग करु लागला.चंद्रावती कृष्णा नदी ओलांडून पलीकडे गेली. पण राजाने तिचा पाठलाग सोडला नाही. तेव्हा चंद्रावतीने राजाला शाप दिला,"तू दगड होऊन पडशील." आणि त्याच क्षणी राजा दगड झाला .मग चंद्रावती श्रीशैल्य पर्वतावर आली व शंकराची तपश्चर्या करु लागली. ती रोज जाई व जुईच्या फ़ुलांची माळ करीत असे व ती शंकराला वाहात असे. जाईला मल्ली आणि जुईला अर्जुनी म्हणतात. चंद्रावतीच्या भक्तीने शंकर प्रसन्न झाले व ते चंद्रावतीपुढे प्रकट झाले.तेव्हा चंद्रावतीने जाईजुईची माळ शंकराला अर्पण केली. त्यावेळी शंकर तिला म्हणाले,"मी येथे मल्लिकार्जुन नावाने लिंगरुपात राहीन. जे माझी सेवा करतील त्यांच्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन." इतके सांगून शंकर गुप्त झाले व तेथे एक दिव्य शिवलिंग प्रकट झाले. त्यावर चंद्रावतीने मंदिर बांधले. तेच मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा