सोरटी सोमनाथ
’ सोमनाथ’ हे पहिले ज्योतिर्लिंग.
गुजरात राज्यातील सौराष्ट्र प्रांतात प्रभास पाटण येथे हे सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे.सौराष्ट्र या नववरुन त्यास सोरटी सोमनाथ हे नाव मिळाले. एके काळी भारतातील सर्वांत मोठे, अत्यंत पवित्र व फ़ार श्रीमंत देवस्थान अशी याची प्रसिध्दी होती. सोमवती अमावस्या व ग्रहण या वेळी येथे मोठी यात्रा भरते. सोमनाथ लिंग कसे निर्माण झाले याविषयी कथा
फ़ार प्राचीन काळी दक्ष नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला सत्तावीस मुली होत्या.त्या सर्व मुलींचे चंद्राशी लग्न झाले.त्या सत्तावीस जणीत जी रोहीणी होती ती चंद्राला फ़ार आवडत असे.ती त्याची लाडकी होती.चंद्र फ़क्त रोहीणीवरच प्रेम करीत असे. यामुळे इतर बायका दुःखी झाल्या.चंद्र त्यांच्याशी बोलतसुध्दा नसे.
दक्ष राजाला हे समजले. तो दुःखी झाला.तो चंद्राला म्हणाला ,"चंद्रा, तू थोर कुळात जन्मास आला आहेस. तेव्हा तू तुझ्या सर्व बायकांवर सारखेच प्रेम कर." दक्ष राजाने असे सांगितले खरे,पण चंद्राने त्याकडे मुळीच लक्ष दिले नाही.
तो आपला फ़क्त रोहीणीवरच प्रेम करु लागला.आपल्या उपदेशाचा काहीच उपयोग झाला नाही हे पाहून दक्षाला चंद्राचा राग आला.त्याने चंद्राला शाप दिला, " तू माझे ऎकले नाहीस म्हणून तुला क्षय होईल."
दक्षाने शाप देताच चंद्राला क्षयरोग झाला. त्याचे तेज हळूहळू कमी होऊ लागले. सगळे देव घाबरले. आता यावर उपाय काय करायचा हे विचारण्यासाठी सर्वजण ब्रम्हदेवाला शरण गेले. तेव्हा ब्रम्हदेव म्हणाले," समुद्रकाठी शंकराची आराधना करा. तेथे शिवलिंगाची स्थापना करा, म्हणजे शंकर प्रसन्न होईल व चंद्राचा रोग जाईल."
सर्व देवांना खूप दिवस तप केल्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले. चंद्राचा क्षयरोग गेला.त्याला त्याचे तेज मिळाले. जेथे चंद्राने शिवलिंग स्थापन केले होते तेथे त्याने मंदिर बांधण्याचे ठरविले. ब्रम्हदेवाने त्याला मदत केली. चंद्राने स्थापन केलेल्या ठिकाणी ब्रम्हदेवाने जमीन उकरली. तेथे एक स्वयंभू शिवलिंग दिसले. ते मध व दर्भ यांनी झाकलेले होते. ब्रम्हदेवाने त्यावर एक शिला बसविली व त्यावर एक मोठे शिवलिंग बसविले. चंद्राने त्याची पूजा केली. हेच सोमनाथ ज्योतिर्लिंग. सोमाचा म्हणजे चंद्राचा क्षयरोग ज्याने नाहीसा केला ते शिवलिंग म्हणजेच सोमनाथ ज्योतिर्लिंग.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा