६. डाकीनी वनातील भीमाशंकर
भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग .पुणे जिल्ह्यातील आंबेगाव पेटा व खेड तालुका यांच्या सीमेवर सह्याद्रीच्या शिखरावर हे भीमाशंकर लिंग आहे. येथे फ़ार पूर्वी डाकीनी नावाचे लोक राहात असत. ते शिवभक्त होते. त्यामुळे तेथील वनाला डाकीनी वन नाव मिळाले.येथूनच भीमा (चंद्रभागा) नदी उगम पावते.दरवर्षी महाशीवरात्रीच्या वेळी चार दिवस येथे मोठी यात्रा भरते. या लिंगावर पाण्याची संततधार अभिषेकपात्रातून चालू असते.
फ़ार फ़ार वर्षांपूर्वी भीम नावाचा एक राक्षस होऊन गेला.तो अतिशय पराक्रमी होता. त्याने ब्रम्हदेवाची फ़ार मोठी तपश्चर्या केली.ब्रम्हदेव भीमावर प्रसन्न झाला. ब्रम्हदेवाच्या कृपेने त्याला खूप शक्ती मिळाली. पण आपल्या बळाचा त्याला गर्व झाला. आपल्या बळाने त्याने इंद्रादी देवांना जिंकले.मग तो पृथ्वी जिंकण्यासाठी निघाला. अनेक लोकांना त्याने ठार मारले. ऋषींचे यज्ञ त्याने मोडून टाकले. सगळ्यांना तो सतावू लागला.
याच वेळी कामरुप देशात सुदक्षिण नावाचा एक राजा होता. तो शंकराचा मोठा भक्त होता.भीम राक्षसाला हे समजले.तो सुदक्षिण राजाकडे गेला. राजा शंकराची अगदी मनोभावे पूजा करीत होता.तोंडाने ’शिव,शिव’ असा सारखा जप चालू होता. ती पूजा पाहून राक्षस भयंकर रागावला.तो राजाला दरडावून म्हणाला,"मी येथे असताना तू हे काय करतो आहेस?माझी पूजा न करता ही कुणाची पूजा करीत आहेस?"
तेव्हा राजा म्हणाला ,"भक्तांचे रक्षण करणाऱ्या भगवान शंकराची मी पूजा करीत आहे." हे ऎकून भीम राक्षसाला राग आला. त्याने आपल्या तलवारीने शिवलिंगावर घाव घातला. त्याच क्षणी शिवलिंगातून भगवान शंकर प्रकट झाले.शंकराचे व भीमाचे घनघोर युध्द झाले. भीमाच्या मदतीला अनेक राक्षस आले.त्या सर्वांना शंकराने ठार मारले. भीम राक्षसाच्या शरीरातून अग्नी बाहेर आला. तो सगळे जग जाळू लागला. तेव्हा भीम राक्षसाला ठार मारण्यासाठी शंकराने प्रचंड म्हणजे भीमरुप घेतले व शेवटी भीम राक्षसाला ठार मारले.म्हणून शंकराला भीमशंकर हे नाव मिळाले.
भीम राक्षसाला ठार मारुन शंकर गुप्त होणार तेवढ्यात सुदक्षिण राजा तेथे आला.शंकराच्या पायावर डोके ठेवून तो म्हणाला, ’परमेश्वरा , भक्तांना दर्शन देण्यासाठी तू येथेच कायमचा रहा.’
शंकरांनी आनंदाने कबूल केले. शंकर गुप्त झाले त्या ठीकाणी एक शिवलिंग निर्माण झाले. तेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा