७. श्री रामेश्वर
रामेश हे सातवे ज्योतिर्लिंग.दक्षिण भारतात तामिळनाडू राज्यातील रामनाथपूरम जिल्ह्यात हे लिंग आहे.हे समुद्रकाठी आहे. याला रामेश्वर असेही म्हणतात.रामेश्वराचे मंदिर अत्यंत भव्य आहे. येथे प्रत्येक दिवस उत्सवाचाच असतो. तरीपण महाशिवरात्र,वैशाख पौर्णिमा ,संक्रांत,चैत्र पाडवा या दिवशी येथे मोठी यात्रा भरते.हे लिंग कसे स्थापन झाले याविषयी कथा अशी-
लंकेचा राजा रावण याने रामाच्या सीतेला लंकेत पळवून नेले.तेव्हा रामाने लंकेवर स्वारी करण्याचे ठरविले. वानर सैन्यासह राम समुद्रकाठी आला. पण लंकेत जायचे कसे? कारण वाटेत मोठा समुद्र.म्हणून रामाने समुद्रावर पूल बांधला.त्याला सेतुबंध असे म्हणतात.राम वानर सैन्यासह लंकेत गेला. रावणाला ठार मारले व तो सीतेला घेऊन परत आला. सगळ्या ऋषींनी रामाला विचारले," रामा, तू इतका दुःखी का?" तेव्हा राम म्हणाला ,"सीतेला सोडविण्यासाठी मला अनेकांना ठार मारावे लागले. रावणाला मी ठार मारले.माझ्या हातून एका ब्राम्हणाची हत्या झाली आहे. याचे मला दुःख होते आहे."
तेव्हा सर्व ऋषी म्हणाले,"रामा , येथे समुद्रकाठी सेतुबंधावर तू जर शिवलिंग स्थापन केले तर तुझे सगळे दोष नाहीसे होतील. शिवाय सर्व मानवांना त्याचा उपयोग होईल."रामाला हा विचार पसंत पडला. तेव्हा शिवलिंग आणण्यासाठी हनुमान कैलास पर्वतावर गेला व शंकराची आराधना करु लागला. हनुमान येण्याची सर्वजण वाट पाहात होते.शिवलिंग स्थापनेचा मुहूर्त जवळ आला.पण हनुमंताचा पत्ता नाही.तेव्हा ऋषी म्हणाले," रामा ,लिंगस्थापनेची वेळ टळता कामा नये. तेव्हा सीतादेवींनी जे वाळूचे लिंग केले आहे त्याचीच आता स्थापना कर." तेव्हा प्रभू रामचंद्राने जेष्ठमास शुध्द दशमी बुधवार या दिवशी विधिपूर्वक वालुका लिंगाची स्थापना केली. त्या क्षणी त्या वालुका लिंगातून भगवान शंकर पार्वतीसह प्रकट झाले. ते रामाला म्हणाले,"राघवेंद्रा, तू स्थापन केलेल्या या वालुका शिवलिंगात मी रामेश्वर या नावाने कायमचा राहीन. जे लोक या लिंगाचे दर्शन घेतील त्यांची सारी पापे नाहीशी होतील."
हे शिवलिंग प्रभू रामचंद्राने सेतुबंधाजवळ स्थापन केले,म्हणून याला सेतुबंध रामेश किंवा रामेश्वर म्हणतात.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा