महाकाल हे तिसरे ज्योतिर्लिंग. मध्यप्रदेशातील माळवा प्रांतात क्षिप्रा नदीच्या काठावर उज्जयिनी येथे हे लिंग आहे. याला महाकालेश्वर असेही म्हणतात.प्रत्येक श्रावणी सोमवारी,विजयादशमी व शिवरात्री या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. सगळ्या जगाला त्रास देणाऱ्या दूषण नावाच्या राक्षसाला शंकराने नुसत्या हुंकाराने ठार मारले. मग शंकराने त्याच ठिकाणी कायमचे राहण्याचे ठरविले म्हणून महाकाल हे नाव पडले.या लिंगाविषयी एक कथा अशी-
फ़ार वर्षांपूर्वी उज्जयिनी येथे चंद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो मोठा शिवभक्त होता. एकदा तो शंकराच्या मंदिरात शंकराची पूजा करीत बसला होता. त्याच वेळी तेथे एक गवळ्याची बाई आली.तिच्याबरोबर तिचा ५ वर्षांचा मुलगासुध्दा होता.त्याचे नाव श्रीकर. त्या मुलाने ती पूजा बघितली व त्याला वाटले,आपणसुध्दा शंकराची पूजा करावी. मग त्याने एक गोल दगड आणला. त्याला स्नान घातले, गंधफ़ुले वाहिली व तो मुलगा डोळे मिटून शंकराचा जप करु लागल.
काही वेळाने त्याच्या आईने त्याला जेवायला हाक मारली. पण मुलगा काही उठला नाही. तिने पुन्हा मोठ्यांदा हाक मारली.तरी तो मुलगा डोळे मिटून बसला, उठला नाही.
तेव्हा त्याची आई तेथे आली. मुलाचा तिला खुप राग आला.तिने ती शंकराची पूजा मोडून टाकली. तिने मुलाच्या हाताला धरले. त्याला ओढीत घेऊन निघाली.शंकराची पूजा आईने मोडली म्हणून मुलगा रडू लागला.तो एकसारखा शंकराचा धावा करु लागला आणि शंकराचा धावा करता करता तो बेशुध्द पडला. भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. थोड्या वेळाने मुलाने डोळे उघडले. तो सावध झाला तो त्याच्यासमोर एक मोठे शिवमंदिर उभे राहीले. त्या मंदिरात एक तेजस्वी ज्योतिर्लिंग दिसत होते. ते पाहून त्या मुलाला खुप आनंद झाला. तो शंकराची प्रार्थना करु लागला. चंद्रसेन राजाला हे समजले. तो तेथे धावतच आला. ते ज्योतिर्लिंग पाहून राजाने त्या मुलाला प्रेमाने जवळ घेतले.
थोड्याच वेळात श्री हनुमान तेथे आले. ते म्हणाले," या मुलाच्या खऱ्या भकतीमुळे शंकर येथे प्रकट झाले. तुम्ही या लिंगाचे दर्शन घ्या म्हणजे तुमचे कल्याण होईल. या मुलाच्या वंशात पुढे श्रीकृष्ण जन्मास येईल. तो खूप पराक्रम करील."
एवढे सांगून श्री हनुमान गुप्त झाला. तेच हे ज्योतिर्लिंग ’महाकाल’ या नावाने प्रसिध्द झाले. प्रचंड शरीराच्या हनुमानाने या लिंगाचे महत्व सर्वांना सांगितले म्हणून याला महाकाल किंवा महाकालेश्वर म्हणतात.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा