वीरशैव समाज कल्याण

कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
८. औंढा नागनाथ



         नागेश हे आठवे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात मराठवाड्यातील परभणी जिल्हयात औंढा नावाचे गाव आहे. या गावाजवळ हे नागेश लिंग आहे. म्हणून याला औंढा नागनाथ असेही म्हणतात. दरवर्षी महाशिवरात्रीला नागनाथ ज्य़ोतिर्लिंगाची मोठी यात्रा भरते.शिवाय चैत्र वद्य एकादशी, श्रावण शुध्द पंचमी व शनिवार, गुरुवार, अमावास्या या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. नागेश लिंगाविषयी कथा अशी -

            फार वर्षांपूर्वी दारुका नावाची राक्षसी पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी तप करीत होती. पार्वती तिच्यावर प्रसन्न झाली. पार्वतीने दारुकाला एक वन दिले. हे वन मोठे मजेशीर होते. दारुका जिकडे जाईल तिकडे ते तिच्यामागे जात असे. या दारुका वनात दारुका आपल्या दारुक नावाच्या पतीबरोबर रहात असे. दारुका व दारुक यांना गर्व झाला. ते दोघेजण सगळ्या लोकांना छळू लागले. अनेक ब्राम्हणांना त्यांनी ठार मारले, बंदीत टाकले. त्या ब्राम्हणांत एक शिवभक्त ब्राम्हण होता. त्याने बंदीशाळेत शंकराची पूजा करु लागले. शंकराची आरती म्हणू लागले. " शंभो शंकर ! शंभो शंकर !" असे एकसारखे मोठ्यांदा म्हणू लागले.

           बंदीशाळेच्या पहारेकऱ्यांना ही बातमी दारुकास सांगीतली. दारुक रागावला. तो बंदीशाळेत आला. त्याने शिवपुजा मोडून टाकली. " पुन्हा जर शंकराची पुजा केलीत तर तुम्हाला ठार करीन." असे त्याने त्या ब्राम्हणांना सांगितले. दारुक दाण्‌ दाण्‌ पाय आपटत निघून गेला.

           ब्राम्हणांनी पुन्हा शंकराची पूजा सुरू केली. दारूकाला हे समजताच तो धावत आला. त्याने लाथेने पूजा मोडुन टाकली. तो ब्राम्हणांना ठार मारु लागला. ब्राम्हणांनी शंकराचा धावा केला. शंकर आपल्या भक्त्तांवर प्रसन्न झाले. ते तेथे प्रकट झाले. त्यांनी दारुकाचा नाश केला. भगवान शंकर भक्त्तांना म्हणाले,"तुम्ही आता काळजी करू नका. मी येथेच नागेश ज्योतिर्लिंगाच्या रुपाने कायमचा राहीन." शंकर गुप्त झाले. तेच नागनाथ किंवा नागेश ज्योतिर्लिंग. भोवतीचे जे अरण्य ते दारुकावन.
     या नागेश लिंगाविषयी आणखी एक कथा आहे -

      दक्ष राजाची मुलगी सती ही शंकराची पत्नी. दक्षाच्या यज्ञकुंडात उडी घेतली. पत्नि जळुन गेली म्हणून शंकर दुःखी झाले. ते दारुकावनात एका सरोवराकाठी जाऊन बसले. एके दिवशी काही ब्राम्हण स्त्रीया तेथे पाणी नेण्यासाठी आल्या. तेथे शंकराला पाहून त्यांना आनंद झाला. त्यांनी शंकराला आपल्या घरी नेले. पोटभर जेवायला वाढले. शंकर भोजन करुन परत निघाले, तेव्हा त्या स्त्रीयाही शंकरामागे निघाल्या.

       त्या स्त्रीयांच्या पतींना हे समजले तेव्हा ते फार रागावले. त्यांनी शंकराला शाप दिला, "आमच्या बायका तू भुलवून नेत आहेस तेव्हा तू येथेच नष्ट होशील."

       ब्राम्हणांचा शाप खरा ठरवा म्हणून शंकरांनी आपल्या शरीराचे भस्म केले. त्या भस्मातून एक तेजस्वी लिंग प्रकट झाले. सर्व देवांनी त्या लिंगाची त्या सरोवरातील पाण्याने पूजा केली. त्या अरण्यात नाग लोक रहात होते. तेव्हा त्या लिंगाची त्रिकाल पूजा करण्याचे काम नाग लोकांना मिळाले; त्यामुळे नागांचा जो नाथ परमेश्वर तो नागनाथ किंवा नागेश असे त्यास नाव मिळाले. हाच तो ओंढा नागनाथ किंवा नागेश.

७. श्री रामेश्वर

७.  श्री रामेश्वर




            रामेश हे सातवे ज्योतिर्लिंग.दक्षिण भारतात तामिळनाडू राज्यातील रामनाथपूरम जिल्ह्यात हे लिंग आहे.हे समुद्रकाठी आहे. याला रामेश्वर असेही म्हणतात.रामेश्वराचे मंदिर अत्यंत भव्य आहे. येथे प्रत्येक दिवस उत्सवाचाच असतो. तरीपण महाशिवरात्र,वैशाख पौर्णिमा ,संक्रांत,चैत्र पाडवा या दिवशी येथे मोठी यात्रा भरते.हे लिंग कसे स्थापन झाले याविषयी कथा अशी-
 
           लंकेचा राजा रावण याने रामाच्या सीतेला लंकेत पळवून नेले.तेव्हा रामाने लंकेवर स्वारी करण्याचे ठरविले. वानर सैन्यासह राम समुद्रकाठी आला. पण लंकेत जायचे कसे? कारण वाटेत मोठा समुद्र.म्हणून रामाने समुद्रावर पूल बांधला.त्याला सेतुबंध असे म्हणतात.राम वानर सैन्यासह लंकेत गेला. रावणाला ठार मारले व तो सीतेला घेऊन परत आला. सगळ्या ‌ऋषींनी रामाला विचारले," रामा, तू इतका दुःखी का?" तेव्हा राम म्हणाला ,"सीतेला सोडविण्यासाठी मला अनेकांना ठार मारावे लागले. रावणाला मी ठार मारले.माझ्या हातून एका ब्राम्हणाची हत्या झाली आहे. याचे मला दुःख होते आहे."
 
            तेव्हा सर्व ‌ऋषी म्हणाले,"रामा , येथे समुद्रकाठी सेतुबंधावर तू जर शिवलिंग स्थापन केले तर तुझे सगळे दोष नाहीसे होतील. शिवाय सर्व मानवांना त्याचा उपयोग होईल."रामाला हा विचार पसंत पडला. तेव्हा शिवलिंग आणण्यासाठी हनुमान कैलास पर्वतावर गेला व शंकराची आराधना करु लागला. हनुमान येण्याची सर्वजण वाट पाहात होते.शिवलिंग स्थापनेचा मुहूर्त जवळ आला.पण हनुमंताचा पत्ता नाही.तेव्हा ‌ऋषी म्हणाले," रामा ,लिंगस्थापनेची वेळ टळता कामा नये. तेव्हा सीतादेवींनी जे वाळूचे लिंग केले आहे त्याचीच आता स्थापना कर." तेव्हा प्रभू रामचंद्राने जेष्ठमास शुध्द दशमी बुधवार या दिवशी विधिपूर्वक वालुका लिंगाची स्थापना केली. त्या क्षणी त्या वालुका लिंगातून भगवान शंकर पार्वतीसह प्रकट झाले. ते रामाला म्हणाले,"राघवेंद्रा, तू स्थापन केलेल्या या वालुका शिवलिंगात मी रामेश्वर या नावाने कायमचा राहीन. जे लोक या लिंगाचे दर्शन घेतील त्यांची सारी पापे नाहीशी होतील."
 
     हे शिवलिंग प्रभू रामचंद्राने सेतुबंधाजवळ स्थापन केले,म्हणून याला सेतुबंध रामेश किंवा रामेश्वर म्हणतात.   

६. भीमाशंकर

६. डाकीनी वनातील भीमाशंकर



                   भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग .पुणे जिल्ह्यातील आंबेगाव पेटा व खेड तालुका यांच्या सीमेवर सह्याद्रीच्या शिखरावर हे भीमाशंकर लिंग आहे. येथे फ़ार पूर्वी डाकीनी नावाचे लोक राहात असत. ते शिवभक्त होते. त्यामुळे तेथील वनाला डाकीनी वन नाव मिळाले.येथूनच भीमा (चंद्रभागा) नदी उगम पावते.दरवर्षी महाशीवरात्रीच्या वेळी चार दिवस येथे मोठी यात्रा भरते. या लिंगावर पाण्याची संततधार अभिषेकपात्रातून चालू असते.
               फ़ार फ़ार वर्षांपूर्वी भीम नावाचा एक राक्षस  होऊन गेला.तो अतिशय पराक्रमी होता. त्याने ब्रम्हदेवाची फ़ार मोठी तपश्चर्या केली.ब्रम्हदेव भीमावर प्रसन्न झाला. ब्रम्हदेवाच्या कृपेने त्याला खूप शक्ती मिळाली. पण आपल्या बळाचा त्याला गर्व झाला. आपल्या बळाने त्याने इंद्रादी देवांना जिंकले.मग तो पृथ्वी जिंकण्यासाठी निघाला. अनेक लोकांना त्याने ठार मारले. ऋषींचे यज्ञ त्याने मोडून टाकले. सगळ्यांना तो सतावू लागला.

            याच वेळी कामरुप देशात सुदक्षिण नावाचा एक राजा होता. तो शंकराचा मोठा भक्त होता.भीम राक्षसाला हे समजले.तो सुदक्षिण राजाकडे गेला. राजा शंकराची अगदी मनोभावे पूजा करीत होता.तोंडाने ’शिव,शिव’ असा सारखा जप चालू होता. ती पूजा पाहून राक्षस भयंकर रागावला.तो राजाला दरडावून म्हणाला,"मी येथे असताना तू हे काय करतो आहेस?माझी पूजा न करता ही कुणाची पूजा करीत आहेस?"

          तेव्हा राजा म्हणाला ,"भक्तांचे रक्षण करणाऱ्या भगवान शंकराची मी पूजा करीत आहे." हे ऎकून भीम राक्षसाला राग आला. त्याने आपल्या तलवारीने शिवलिंगावर घाव घातला. त्याच क्षणी शिवलिंगातून भगवान शंकर प्रकट झाले.शंकराचे व भीमाचे घनघोर युध्द झाले. भीमाच्या मदतीला अनेक राक्षस आले.त्या सर्वांना शंकराने ठार मारले. भीम राक्षसाच्या शरीरातून अग्नी बाहेर आला. तो सगळे जग जाळू लागला. तेव्हा भीम राक्षसाला ठार मारण्यासाठी शंकराने प्रचंड म्हणजे भीमरुप घेतले व शेवटी भीम राक्षसाला ठार मारले.म्हणून शंकराला भीमशंकर हे नाव मिळाले.

               भीम राक्षसाला ठार मारुन शंकर गुप्त होणार तेवढ्यात सुदक्षिण राजा तेथे आला.शंकराच्या पायावर डोके ठेवून तो म्हणाला, ’परमेश्वरा , भक्तांना दर्शन देण्यासाठी तू येथेच कायमचा रहा.’


              शंकरांनी आनंदाने कबूल केले. शंकर गुप्त झाले त्या ठीकाणी एक शिवलिंग निर्माण झाले. तेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग.   

6 bhimashankar


महाशिवरात्रीची व्रतकथा


एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले, ''असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रत-पूजन आहे, ज्यामुळे मृत्यू-लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल?'' उत्तरादाखल शंकराने पार्वतीला 'शिवरात्री'च्या व्रताची कथा सांगितली.

'एका गावात एक शिकारी राहत होता. मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे. तो सावकाराचा कर्जदार होता. त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकविले नव्हते. त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनविले. योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती.

शिकारी ध्यानमग्न होऊन शिवा संबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला. चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली. सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले. शिकारी दुसर्‍या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला.

आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला. पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान-भुकेने व्याकूळ झाला होता. शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचाण बांधू लागला. बेल-वृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते. शिकार्‍याला मात्र हे माहीत नव्हते. मचाण बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या. याप्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकार्‍याचे व्रतही झाले आणि त्याच्याकरवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले.

एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहचली. शिकार्‍याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यात ती हरिणी बोलली, मी गर्भिणी आहे, तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील. हे योग्य नाही. मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईल. तेव्हा तू मला मार.' शिकार्‍याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडांआड लुप्त झाली.

काही वेळाने दुसरी हरिणी तेथून निघाली. शिकार्‍याच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याने तिच्यावर नेम साधला. हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले, की 'हे पारधी! मी एक कामातूर विरहिणी आहे. आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल.'

शिकारीने तिलाही जाऊ दिले. दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला. तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिलासोबत तेथून निघाली. शिकार्‍याला जणू सुवर्णसंधीच मिळाली. त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिणी बोलली, हे पारधी! मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते, यावेळी तू मला मारू नकोस.'

शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे. माझी मुले तहान-भुकेने व्याकूळ झाले असतील.उत्तरादाखल हरिणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे. त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव. मी लगेच परत येईल.

हरिणीचा तो व्याकूळ स्वर ऐकून शिकार्‍याला तिची दया आली. त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता. काही वेळाने एक धष्ट-पुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता. आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला.

पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दीनवाण्या स्वरात म्हणाला, 'हे पारधी! जर तू माझ्या आधी तीन हरिणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस, म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दु:ख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील तर मला काही क्षणांसाठी जीवनदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल.

मृगाचे बोलणे ऐकून शिकार्‍याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटना-चक्र आले. त्याने सर्व कथा मृगाला ऐकविली. तेव्हा मृगाने सांगितले, ' माझ्या तीनही पत्नी येथून वचनबध्द होऊन गेल्या आहेत, मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत. त्यामुळे तू मला आता जाऊ दे, मी त्यांच्यासमवेत तुझ्यासमोर हजर होतो.

उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते. धनुष्य त्याच्या हातातून निसटले. शिवाने त्याच्या ह्रदयात बदल घडवून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्मांचा पश्चात्ताप झाला.

थोड्याच वेळात मृग सपरिवार शिकार्‍यासमोर आला. या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकार्‍याच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. शिकार्‍याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले.

देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची परिणती झाल्याबरोबर देवी-देवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली

५. परळी वैद्यनाथ


वैद्यनाथ हे पाचवे ज्योतिर्लिंग. महाराष्ट्रातील मराठवाडा प्रांतात बीड जिल्ह्यात परळी नावाचे गाव आहे. त्या ठीकाणी हे ज्योतिर्लिंग आहे. येथे भगवान शंकर पार्वतीसह राहतात,म्हणून या ठिकाणाला फ़ार महत्त्व आहे.वैद्यनाथला वैजनाथ असेही म्हणतात.
एकदा रावणाने हिमालयात जाऊन शंकराची आराधना केली. शंकर प्रसन्न झाले व म्हणाले,"वर माग."
तेव्हा रावण म्हणाला,"मला खूप शक्ती मिळावी व आपण शिवलिंग रुपाने माझ्या लंकेत राहावे." शंकरांनी ही गोष्ट मान्य केली.आपले लिंग रावणाला देऊन शंकर म्हणाले," हे लिंग लंकेत नेण्यापूर्वी पृथ्वीवर जेथे टेकेल तेथेच कायम राहील."
रावणाने ते कबूल केले. पण शिवलिंग फ़ारच जड होते. रावणाला ते नेता येईना. तेव्हा शंकरांनी त्या लिंगाला दोन रुपे दिली व ती लिंगे कावडीतून नेण्यास सांगितले. रावण कावड घेऊन लंकेला निघाला.वाटेत त्याला लघवी लागली.शिवलिंगे खांद्यावर घेऊन लघवी कशी करायची? काय करावे? असा तो विचार करु लागला.इतक्यात त्याला एक गवळी दिसला.रावणाला आनंद झाला.त्या गवळ्याच्या हाती कावड देऊन रावण त्याला म्हणाला,"मी लघवी करुन येतो तोपर्यंत हे कावड खांद्यावर धरुन ठेव." रावण लघवी करायला गेला, पण त्या गवळ्याच्या कावडीचा भार सोसेना.त्याला उभेही राहता येईना. त्याने कावड जमिनीला टेकवली. त्या क्षणी कावडीतील एक लिंग जमिनीला चिकटले. रावण परत आला. त्याने ते चिकटलेले लिंग उचलण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही.मग रावण दुसरे लिंग घेऊन निघाला.पण वाटेत तेही लिंग जमिनीला चिकटले. ते झाले गोकर्ण महाबळेश्वर.गाईच्या कानाचा आकार आहे म्हणून त्या लिंगाला गोकर्ण महाबळेश्वर असेही म्हणतात.
रावण निराश होऊन लंकेला गेला. मग सगळे देव त्या पहिल्या लिंगाजवळ आले.त्यांनी शिवलिंगाची पूजा केली व प्रार्थना केली," या लिंगाची जो सेवा करील त्याला सर्व सुखाचा लाभ होवो." शंकरांनी ते मान्य केले.तेव्हापासून हे लिंग वैजनाथ म्हणून प्रसिध्द झाले. देवांचा वैद्य धन्वंतरी याने या वैजनाथ लिंगात प्रवेश केला म्हणून याला वैद्यनाथ असे म्हणतात.
विजयादशमी व वैकुंठ चतुर्दशीला येथे उत्सव असतो. श्रावणात महिनाभर देवावर अभिषेक असतो.

४.ओंकारेश्वर


ओंकार अमलेश्वर हे चौथे ज्योतिर्लिंग. मध्यप्रदेशातील नेमाड जिल्हयात नर्मदा नदीच्या काठावर हे लिंग आहे. जवळच ओंकार मांधाता नगरी आहे. येथे नर्मदा नदीस ओंकाराचा आकार आहे, म्हणून याला ओंकारेश्वर असेही म्हणतात. कार्तिकी पौर्णिमा व शिवरात्री या दिवशी येथे खूप मोठी यात्रा भरते.
एकदा काय झाले, विंध्य पर्वताला फ़ार गर्व झाला.एकदा नारदमुनी त्याच्याकडे आले होते. तेव्हा विंध्य म्हणाला, " माझ्या इतका मोठा जगात कोणीच नाही. खरे आहे की नाही?" तेव्हा नारदमुनी हसून म्हणाले,"नाही, तुझ्यापेक्षा हिमालय श्रेष्ठ आहे.सगळे देव त्याला मान देतात."
हे एकून विंध्याला दुःख झाले.मग त्याने सहा महिने शंकराची आराधना केली. शंकर प्रसन्न झाले. ओंकाररुपात शंकर प्रकट झाले.ते म्हणाले,"विंध्या ,मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा तो वर माग."
या वरदानामुळे विंध्य पर्वताला आनंद झाला. आनंदित झालेले देव व ऋषी तेथे आले. त्या सर्वांनी शंकराची पूजा केली. मग ते सर्वजण हात जोडून म्हणाले,"भगवान महादेवा, सर्व लोकांच्या कल्याणासाठी तू येथेच कायमचा रहा."
तेव्हा शंकर म्हणाले,"तथास्तु!" आणि शंकर गुप्त झाले. तेथे दोन शिवलिंगे प्रकट झाली. एका लिंगात शंकराने ओंकारेश्वर नावाने प्रवेश केला व दुसऱ्या लिंगात अमरेश्वर किंवा अमलेश्वर या नावाने प्रवेश केला. अशी ही ओंकार व अमलेश्वर दोन ज्योतिर्लिंगे निर्माण झाली.
नंतर सर्व देव व ऋषी त्या लिंगाची पूजा करुन निघून गेले. येथे शंकराची जो पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

३. उज्जयिनीतील महाकालेश्वर


महाकाल हे तिसरे ज्योतिर्लिंग. मध्यप्रदेशातील माळवा प्रांतात क्षिप्रा नदीच्या काठावर उज्जयिनी येथे हे लिंग आहे. याला महाकालेश्वर असेही म्हणतात.प्रत्येक श्रावणी सोमवारी,विजयादशमी व शिवरात्री या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. सगळ्या जगाला त्रास देणाऱ्या दूषण नावाच्या राक्षसाला शंकराने नुसत्या हुंकाराने ठार मारले. मग शंकराने त्याच ठिकाणी कायमचे राहण्याचे ठरविले म्हणून महाकाल हे नाव पडले.या लिंगाविषयी एक कथा अशी-
फ़ार वर्षांपूर्वी उज्जयिनी येथे चंद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो मोठा शिवभक्त होता. एकदा तो शंकराच्या मंदिरात शंकराची पूजा करीत बसला होता. त्याच वेळी तेथे एक गवळ्याची बाई आली.तिच्याबरोबर तिचा ५ वर्षांचा मुलगासुध्दा होता.त्याचे नाव श्रीकर. त्या मुलाने ती पूजा बघितली व त्याला वाटले,आपणसुध्दा शंकराची पूजा करावी. मग त्याने एक गोल दगड आणला. त्याला स्नान घातले, गंधफ़ुले वाहिली व तो मुलगा डोळे मिटून शंकराचा जप करु लागल.
काही वेळाने त्याच्या आईने त्याला जेवायला हाक मारली. पण मुलगा काही उठला नाही. तिने पुन्हा मोठ्यांदा हाक मारली.तरी तो मुलगा डोळे मिटून बसला, उठला नाही.
तेव्हा त्याची आई तेथे आली. मुलाचा तिला खुप राग आला.तिने ती शंकराची पूजा मोडून टाकली. तिने मुलाच्या हाताला धरले. त्याला ओढीत घेऊन निघाली.शंकराची पूजा आईने मोडली म्हणून मुलगा रडू लागला.तो एकसारखा शंकराचा धावा करु लागला आणि शंकराचा धावा करता करता तो बेशुध्द पडला. भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. थोड्या वेळाने मुलाने डोळे उघडले. तो सावध झाला तो त्याच्यासमोर एक मोठे शिवमंदिर उभे राहीले. त्या मंदिरात एक तेजस्वी ज्योतिर्लिंग दिसत होते. ते पाहून त्या मुलाला खुप आनंद झाला. तो शंकराची प्रार्थना करु लागला. चंद्रसेन राजाला हे समजले. तो तेथे धावतच आला. ते ज्योतिर्लिंग पाहून राजाने त्या मुलाला प्रेमाने जवळ घेतले.
थोड्याच वेळात श्री हनुमान तेथे आले. ते म्हणाले," या मुलाच्या खऱ्या भकतीमुळे शंकर येथे प्रकट झाले. तुम्ही या लिंगाचे दर्शन घ्या म्हणजे तुमचे कल्याण होईल. या मुलाच्या वंशात पुढे श्रीकृष्ण जन्मास येईल. तो खूप पराक्रम करील."
एवढे सांगून श्री हनुमान गुप्त झाला. तेच हे ज्योतिर्लिंग ’महाकाल’ या नावाने प्रसिध्द झाले. प्रचंड शरीराच्या हनुमानाने या लिंगाचे महत्व सर्वांना सांगितले म्हणून याला महाकाल किंवा महाकालेश्वर म्हणतात.

२. श्रीशैल्य-मल्लिकार्जुन


मल्लिकार्जुन हे दुसरे ज्योतिर्लिंग.आंध्र प्रदेशातील कुर्नुल जिल्हयात श्रीशैल्य पर्वतावर हे लिंग आहे.शंकराचा पुत्र कार्तिकेय रुसुन श्रीशैल्य पर्वतावर गेला म्हणून शंकर पार्वतीसह श्रीशैल्यावर आले व लिंगरुपाने तेथे कायमचे राहीले. हे एक प्राचीन पवित्र तीर्थस्थळ आहे.

फ़ार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. चंद्रगुप्त नावाचा एक राजा होता. त्या राजाला देवीच्या आशिर्वादाने एक मुलगी झाली. तिचे नाव चंद्रावती. चंद्रावती जन्मास आली त्याच वेळेस चंद्रगुप्त स्वारीवर गेला.परंतु त्याच्या शत्रुंनी त्याला पकडले व चौदा वर्षे तुरुंगात ठेवले.चौदा वर्षानंतर राजा घरी परत आला तो त्याला चौदा वर्षांची रुपवती चंद्रावती दिसली. ही आपली मुलगी आहे हे तो विसरला होता. चंद्रावती आपली बायको झाली पाहीजे असे त्याला वाटू लागले." ही तुमची मुलगी आहे.ती तुमची बायको कशी होईल?" असे राणीने वारंवार सांगितले. पण राजाला ते पटेना. तो चंद्रावतीला पकडू लागला.चंद्रावती घाबरली आणि एक दिवस रात्री एक गाय बरोबर घेऊन घराबाहेर पळाली. राजाला हे समजताच तो तिचा पाठलाग करु लागला.चंद्रावती कृष्णा नदी ओलांडून पलीकडे गेली. पण राजाने तिचा पाठलाग सोडला नाही. तेव्हा चंद्रावतीने राजाला शाप दिला,"तू दगड होऊन पडशील." आणि त्याच क्षणी राजा दगड झाला .मग चंद्रावती श्रीशैल्य पर्वतावर आली व शंकराची तपश्चर्या करु लागली. ती रोज जाई व जुईच्या फ़ुलांची माळ करीत असे व ती शंकराला वाहात असे. जाईला मल्ली आणि जुईला अर्जुनी म्हणतात. चंद्रावतीच्या भक्तीने शंकर प्रसन्न झाले व ते चंद्रावतीपुढे प्रकट झाले.तेव्हा चंद्रावतीने जाईजुईची माळ शंकराला अर्पण केली. त्यावेळी शंकर तिला म्हणाले,"मी येथे मल्लिकार्जुन नावाने लिंगरुपात राहीन. जे माझी सेवा करतील त्यांच्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन." इतके सांगून शंकर गुप्त झाले व तेथे एक दिव्य शिवलिंग प्रकट झाले. त्यावर चंद्रावतीने मंदिर बांधले. तेच मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग.

१. सोमनाथ

सोरटी सोमनाथ


’ सोमनाथ’ हे पहिले ज्योतिर्लिंग.
गुजरात राज्यातील सौराष्ट्र प्रांतात प्रभास पाटण येथे हे सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे.सौराष्ट्र या नववरुन त्यास सोरटी सोमनाथ हे नाव मिळाले. एके काळी भारतातील सर्वांत मोठे, अत्यंत पवित्र व फ़ार श्रीमंत देवस्थान अशी याची प्रसिध्दी होती. सोमवती अमावस्या व ग्रहण या वेळी येथे मोठी यात्रा भरते. सोमनाथ लिंग कसे निर्माण झाले याविषयी कथा


फ़ार प्राचीन काळी दक्ष नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला सत्तावीस मुली होत्या.त्या सर्व मुलींचे चंद्राशी लग्न झाले.त्या सत्तावीस जणीत जी रोहीणी होती ती चंद्राला फ़ार आवडत असे.ती त्याची लाडकी होती.चंद्र फ़क्त रोहीणीवरच प्रेम करीत असे. यामुळे इतर बायका दुःखी झाल्या.चंद्र त्यांच्याशी बोलतसुध्दा नसे.
दक्ष राजाला हे समजले. तो दुःखी झाला.तो चंद्राला म्हणाला ,"चंद्रा, तू थोर कुळात जन्मास आला आहेस. तेव्हा तू तुझ्या सर्व बायकांवर सारखेच प्रेम कर." दक्ष राजाने असे सांगितले खरे,पण चंद्राने त्याकडे मुळीच लक्ष दिले नाही.
तो आपला फ़क्त रोहीणीवरच प्रेम करु लागला.आपल्या उपदेशाचा काहीच उपयोग झाला नाही हे पाहून दक्षाला चंद्राचा राग आला.त्याने चंद्राला शाप दिला, " तू माझे ऎकले नाहीस म्हणून तुला क्षय होईल."

दक्षाने शाप देताच चंद्राला क्षयरोग झाला. त्याचे तेज हळूहळू कमी होऊ लागले. सगळे देव घाबरले. आता यावर उपाय काय करायचा हे विचारण्यासाठी सर्वजण ब्रम्हदेवाला शरण गेले. तेव्हा ब्रम्हदेव म्हणाले," समुद्रकाठी शंकराची आराधना करा. तेथे शिवलिंगाची स्थापना करा, म्हणजे शंकर प्रसन्न होईल व चंद्राचा रोग जाईल."
सर्व देवांना खूप दिवस तप केल्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले. चंद्राचा क्षयरोग गेला.त्याला त्याचे तेज मिळाले. जेथे चंद्राने शिवलिंग स्थापन केले होते तेथे त्याने मंदिर बांधण्याचे ठरविले. ब्रम्हदेवाने त्याला मदत केली. चंद्राने स्थापन केलेल्या ठिकाणी ब्रम्हदेवाने जमीन उकरली. तेथे एक स्वयंभू शिवलिंग दिसले. ते मध व दर्भ यांनी झाकलेले होते. ब्रम्हदेवाने त्यावर एक शिला बसविली व त्यावर एक मोठे शिवलिंग बसविले. चंद्राने त्याची पूजा केली. हेच सोमनाथ ज्योतिर्लिंग. सोमाचा म्हणजे चंद्राचा क्षयरोग ज्याने नाहीसा केला ते शिवलिंग म्हणजेच सोमनाथ ज्योतिर्लिंग.
HTML Comment Box is loading comments...
Free Flash TemplatesRiad In FezFree joomla templatesAgence Web MarocMusic Videos OnlineFree Website templateswww.seodesign.usFree Wordpress Themeswww.freethemes4all.comFree Blog TemplatesLast NewsFree CMS TemplatesFree CSS TemplatesSoccer Videos OnlineFree Wordpress ThemesFree CSS Templates Dreamweaver