वैद्यनाथ हे पाचवे ज्योतिर्लिंग. महाराष्ट्रातील मराठवाडा प्रांतात बीड जिल्ह्यात परळी नावाचे गाव आहे. त्या ठीकाणी हे ज्योतिर्लिंग आहे. येथे भगवान शंकर पार्वतीसह राहतात,म्हणून या ठिकाणाला फ़ार महत्त्व आहे.वैद्यनाथला वैजनाथ असेही म्हणतात.
एकदा रावणाने हिमालयात जाऊन शंकराची आराधना केली. शंकर प्रसन्न झाले व म्हणाले,"वर माग."
तेव्हा रावण म्हणाला,"मला खूप शक्ती मिळावी व आपण शिवलिंग रुपाने माझ्या लंकेत राहावे." शंकरांनी ही गोष्ट मान्य केली.आपले लिंग रावणाला देऊन शंकर म्हणाले," हे लिंग लंकेत नेण्यापूर्वी पृथ्वीवर जेथे टेकेल तेथेच कायम राहील."
रावणाने ते कबूल केले. पण शिवलिंग फ़ारच जड होते. रावणाला ते नेता येईना. तेव्हा शंकरांनी त्या लिंगाला दोन रुपे दिली व ती लिंगे कावडीतून नेण्यास सांगितले. रावण कावड घेऊन लंकेला निघाला.वाटेत त्याला लघवी लागली.शिवलिंगे खांद्यावर घेऊन लघवी कशी करायची? काय करावे? असा तो विचार करु लागला.इतक्यात त्याला एक गवळी दिसला.रावणाला आनंद झाला.त्या गवळ्याच्या हाती कावड देऊन रावण त्याला म्हणाला,"मी लघवी करुन येतो तोपर्यंत हे कावड खांद्यावर धरुन ठेव." रावण लघवी करायला गेला, पण त्या गवळ्याच्या कावडीचा भार सोसेना.त्याला उभेही राहता येईना. त्याने कावड जमिनीला टेकवली. त्या क्षणी कावडीतील एक लिंग जमिनीला चिकटले. रावण परत आला. त्याने ते चिकटलेले लिंग उचलण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही.मग रावण दुसरे लिंग घेऊन निघाला.पण वाटेत तेही लिंग जमिनीला चिकटले. ते झाले गोकर्ण महाबळेश्वर.गाईच्या कानाचा आकार आहे म्हणून त्या लिंगाला गोकर्ण महाबळेश्वर असेही म्हणतात.
रावण निराश होऊन लंकेला गेला. मग सगळे देव त्या पहिल्या लिंगाजवळ आले.त्यांनी शिवलिंगाची पूजा केली व प्रार्थना केली," या लिंगाची जो सेवा करील त्याला सर्व सुखाचा लाभ होवो." शंकरांनी ते मान्य केले.तेव्हापासून हे लिंग वैजनाथ म्हणून प्रसिध्द झाले. देवांचा वैद्य धन्वंतरी याने या वैजनाथ लिंगात प्रवेश केला म्हणून याला वैद्यनाथ असे म्हणतात.
विजयादशमी व वैकुंठ चतुर्दशीला येथे उत्सव असतो. श्रावणात महिनाभर देवावर अभिषेक असतो.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा