८. औंढा नागनाथ
नागेश हे आठवे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात मराठवाड्यातील परभणी जिल्हयात औंढा नावाचे गाव आहे. या गावाजवळ हे नागेश लिंग आहे. म्हणून याला औंढा नागनाथ असेही म्हणतात. दरवर्षी महाशिवरात्रीला नागनाथ ज्य़ोतिर्लिंगाची मोठी यात्रा भरते.शिवाय चैत्र वद्य एकादशी, श्रावण शुध्द पंचमी व शनिवार, गुरुवार, अमावास्या या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. नागेश लिंगाविषयी कथा अशी -
फार वर्षांपूर्वी दारुका नावाची राक्षसी पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी तप करीत होती. पार्वती तिच्यावर प्रसन्न झाली. पार्वतीने दारुकाला एक वन दिले. हे वन मोठे मजेशीर होते. दारुका जिकडे जाईल तिकडे ते तिच्यामागे जात असे. या दारुका वनात दारुका आपल्या दारुक नावाच्या पतीबरोबर रहात असे. दारुका व दारुक यांना गर्व झाला. ते दोघेजण सगळ्या लोकांना छळू लागले. अनेक ब्राम्हणांना त्यांनी ठार मारले, बंदीत टाकले. त्या ब्राम्हणांत एक शिवभक्त ब्राम्हण होता. त्याने बंदीशाळेत शंकराची पूजा करु लागले. शंकराची आरती म्हणू लागले. " शंभो शंकर ! शंभो शंकर !" असे एकसारखे मोठ्यांदा म्हणू लागले.
बंदीशाळेच्या पहारेकऱ्यांना ही बातमी दारुकास सांगीतली. दारुक रागावला. तो बंदीशाळेत आला. त्याने शिवपुजा मोडून टाकली. " पुन्हा जर शंकराची पुजा केलीत तर तुम्हाला ठार करीन." असे त्याने त्या ब्राम्हणांना सांगितले. दारुक दाण् दाण् पाय आपटत निघून गेला.
ब्राम्हणांनी पुन्हा शंकराची पूजा सुरू केली. दारूकाला हे समजताच तो धावत आला. त्याने लाथेने पूजा मोडुन टाकली. तो ब्राम्हणांना ठार मारु लागला. ब्राम्हणांनी शंकराचा धावा केला. शंकर आपल्या भक्त्तांवर प्रसन्न झाले. ते तेथे प्रकट झाले. त्यांनी दारुकाचा नाश केला. भगवान शंकर भक्त्तांना म्हणाले,"तुम्ही आता काळजी करू नका. मी येथेच नागेश ज्योतिर्लिंगाच्या रुपाने कायमचा राहीन." शंकर गुप्त झाले. तेच नागनाथ किंवा नागेश ज्योतिर्लिंग. भोवतीचे जे अरण्य ते दारुकावन.
या नागेश लिंगाविषयी आणखी एक कथा आहे -
दक्ष राजाची मुलगी सती ही शंकराची पत्नी. दक्षाच्या यज्ञकुंडात उडी घेतली. पत्नि जळुन गेली म्हणून शंकर दुःखी झाले. ते दारुकावनात एका सरोवराकाठी जाऊन बसले. एके दिवशी काही ब्राम्हण स्त्रीया तेथे पाणी नेण्यासाठी आल्या. तेथे शंकराला पाहून त्यांना आनंद झाला. त्यांनी शंकराला आपल्या घरी नेले. पोटभर जेवायला वाढले. शंकर भोजन करुन परत निघाले, तेव्हा त्या स्त्रीयाही शंकरामागे निघाल्या.
त्या स्त्रीयांच्या पतींना हे समजले तेव्हा ते फार रागावले. त्यांनी शंकराला शाप दिला, "आमच्या बायका तू भुलवून नेत आहेस तेव्हा तू येथेच नष्ट होशील."
ब्राम्हणांचा शाप खरा ठरवा म्हणून शंकरांनी आपल्या शरीराचे भस्म केले. त्या भस्मातून एक तेजस्वी लिंग प्रकट झाले. सर्व देवांनी त्या लिंगाची त्या सरोवरातील पाण्याने पूजा केली. त्या अरण्यात नाग लोक रहात होते. तेव्हा त्या लिंगाची त्रिकाल पूजा करण्याचे काम नाग लोकांना मिळाले; त्यामुळे नागांचा जो नाथ परमेश्वर तो नागनाथ किंवा नागेश असे त्यास नाव मिळाले. हाच तो ओंढा नागनाथ किंवा नागेश.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा